मुंबई- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येऊन एक वेगळंच सरकार दिलं आहे. पण तिन्ही भिन्न विचारसरणीचे हे पक्ष एकत्र आल्यानं सरकारच्या स्थैर्याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे या आघाडीत मंत्रिपदावरून अद्याप एकमत झाले नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार केवळ फुटीच्या भीतीने रखडला असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल याची कोणालाच शाश्वती नाही. शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीसुद्धा या शिवसेना-भाजपा केव्हाही एकत्र येतील, असं भाष्य केलं आहे.आता असं वाटतं छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसात वाद करण्यापेक्षा थोडं सहन करावं, काही गोष्टी असल्यास त्यांनी एकमेकांना आग्रहानं सांगाव्यात, एकत्र काम केल्यास दोघांच्याही फायद्याचं ठरेल, अशी मला खात्री आहे. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्तानं, पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्याबाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधीच जाणार नाही, असं नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे. एकंदरीतच शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्यावर मनोहर जोशींनी सूतोवाच केले आहेत.
योग्य वेळ येताच शिवसेना-भाजपा एकत्र, सेनेच्या ज्येष्ठ नेत्याला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 6:25 PM