मनोहर कुंभेजकरमुंबई : गेले काही दिवस भाजपा व शिवसेनेत युती होणार की नाही याबद्दल शिवसेना व भाजपात साशंकता होती. मात्र, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. उद्या, सोमवार दि, 18 रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह खास मुंबईत येत आहेत. शाह व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बीकेसी एमसीए येथे सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची अधिकृत माहिती लोकमतला मिळाली आहे.लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या युतीतील जागावाटपाचा ठरलेला अंतिम फॉर्म्युला उद्या पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वीच रात्री युतीबाबत महत्वाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेकडून शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व भाजपाकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीची गुप्तता ठेवण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा व विधानसभा निवडणुका युती एकत्रीत लढण्याचे ठरले असून या दोन्ही निवडणुकीचा फॉर्म्युला देखिल ठरला, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात लोकसभेसाठी दोन्ही पक्ष २४-२४ जागा लढणार असून विधानसभेच्या १४५ जागा भाजपा लढेल, तर शिवसेनेला १४३ जागा दिल्या जातील हा फॉर्म्युला या बैठकीत ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर लोकसभेची पालघरची जागा शिवसेनेला देण्याला भाजपाने अखेर अनुकूलता दाखवली आहे. तसेच शिवसेनेच्या काही महत्वाच्या मागण्यादेखिल भाजपाने मान्य केल्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते.
शिवसेना-भाजपाचं जमलं! उद्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 6:24 PM