मुंबई – आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, शिवसेना भाजपमध्ये गेल्या साडे चार वर्षात निर्माण झालेले मतभेद मिटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मुंबईत सेना-भाजपच्या आमदारांची सयुक्त बैठक बोलवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सेनचा की भाजपचा यावरून दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळे विधान करत असल्याने, दोन्ही पक्षातील मतभेद समोर आले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका युतीला बसू नयेत म्हणून, तसेच दोन्ही पक्षातील नेत्यांचा मनोमीलन व्हावे यासाठी सत्ताधारी भाजप-शिवसेना आमदारांची संयुक्त बैठक सोमवारी विधानभवनात सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे युतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत युतीला राज्यात चागंले यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे विधानसभेत सुद्धा युतीचेच सरकार यावे म्हणून, दोन्ही पक्षातील नेत्यांची एकमेकांविरोधातील असलेली नाराजी दूर करणे महत्वाचे आहे. तसेच, विद्यमान विधानसभेतील अखेरच्या अधिवेशनात युतीच्या सर्व आमदारांचे मनोमिलन होण्याची आशा प्रमुख नेत्यांना आहे. यामुळे युतीच्या आमदारांची संयुक्त बैठक महत्त्वाची ठरणार आहे.