मुंबई - अनंत गीते यांनी केलेलं विधान योग्य नाही. शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवारांनी(Sharad Pawar) काँग्रेस पक्ष फोडला असं नाही त्यांना काँग्रेसमधून काढलं आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गीते यांच्या विधानावर भाष्य केले आहे. त्याचसह दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेना-भाजपानं(Shivsena-BJP) एकत्र यावं अशी मागणी आठवलेंनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, त्याकाळी सोनिया गांधी या परदेशी असल्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार, तारिक अन्वर, नगमा यांनी पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात सोनिया गांधी(Sonia Gandhi) या परदेशी असल्याने त्या पंतप्रधान बनल्यास त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो. त्यामुळे याचा विचार करायला हवा असं त्यांनी म्हटलं होतं. या घटनेनंतर शरद पवार यांना काँग्रेस पक्षातून काढलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणता येणार नाही असं त्यांनी सांगितले.
तर शिवसेना नेत्याने अशाप्रकारे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेत त्यामुळे शिवसेनेने आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा भाजपा-आरपीआयसोबत येऊन बाळासाहेब ठाकरे यांचं शिवशक्ती-भीमशक्तीचं स्वप्न साकार केले पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून शिवसेनेला नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे भवितव्याच्या दृष्टीने शिवसेनेने भाजपासोबत आलं पाहिजे. अडीच वर्षाचा फॉर्म्युला घेऊन शिवसेना-भाजपाने एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी राज्यासाठी खेचून आणावा. दसरा मेळाव्याआधी शिवसेना- भाजपाने एकत्र आलं पाहिजे अशी मागणी मंत्री रामदास आठवलेंनी(Ramdas Athvale) केली आहे.
दरम्यान, तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत असतात. त्यामुळे तिघांनी एकत्र सत्तेत राहणं बरोबर नाही. काँग्रेसनं पाठिंबा काढावा अथवा शिवसेनेने या दोघांची साथ सोडून पुन्हा माघारी परतावं. भाजपासोबत शिवसेनेने यावं. पुढील निवडणुका एकत्र लढवाव्यात आणि महाराष्ट्राचं भलं करावं असंही रामदास आठवले म्हणाले.
काय म्हणाले होते अनंत गीते?
मुख्यमंत्री आपला आहे म्हणून राज्यात सरकार आपले आहे. बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे. सत्ता मविआ नेते सांभाळतील. तुमची आणि माझी जबाबदारी आपलं गाव सांभाळायचं आहे. त्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीचा नव्हे तर शिवसेनेचाच विचार करायचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांचे तोंड बघत होते का? या दोन्ही पक्षांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एकमेकांच्या विचाराचे होऊ शकत नाही मग शिवसेना काँग्रेसी विचारांची होऊ शकते का? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार. आपली ओळख आपण कधीही विसरता कामा नये. आमचा नेता फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. इतर कुणीही होऊ शकत नाही. मग त्या नेत्याने काहीही उपाधी लावू दे. मग जाणता राजा असं स्वत:ला म्हणवलं तरीही ने आमचे नेते नाहीत. गुरु नाहीत. असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते(Anant Gite) यांनी शरद पवारांना लगावला आहे.