मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तेचा पेच आता सुटला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत दोन दिवसांपूर्वी ट्विस्ट आले होते. मात्र ते संकट टळले. परंतु, त्या घटनेमुळे भाजपच्या निशान्यावर आता सदैव शिवसेना राहणार हे स्पष्ट झाले.
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सरकार स्थापन करणार हे निश्चित झाल्यानंतर अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष भाजपसाठी निष्कलंक झाला हे स्पष्टच होते. राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेवर आलेल्या भाजपसाठी राष्ट्रवादीच मुख्य शत्रु पक्ष होता. मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे सर्वच समीकरण बदललं.
विशेष म्हणजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सिंचन घोटाळ्याची त्यांची सुरू असलेली चौकशी थांबविण्यात आली. त्या संदर्भातील तपासही बंद कऱण्यात आला. अर्थात यामुळे राष्ट्रवादी पक्ष निष्कलंक असल्याचा संदेश गेला. त्यामुळे आता भाजपसाठी राष्ट्रवादीला धारेवर धरताना मर्यादा येणार आहेत.
दरम्यान राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध युती तुटल्यामुळे बिघडलेले आहेत. सहाजिकच भाजपच्या निशान्यावर यापुढे इतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेनाच प्राधान्याने राहणार आहे.