मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान, यानंतर नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्हाला आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. आमचा कोणताही वेगळा गट नाही. एकनाथ शिंदे नावाचा गट नाही. आमचा जो मूळ पक्ष आहे, विचारांपासून जो दूर नेला होता. एकनाथ शिंदेंनी जो हिंदुत्ववादी विचारसरणीची पताका हाती घेतली होती त्याचा हा विजय आहे,” असं नरेश म्हस्के म्हणाले.
“बाळासाहेबांचा विचार, त्यांचा आशीर्वाद, धर्मवीर आनंद दीघे यांचा आशीर्वाद आमच्यासोबत होता. सर्व शिवसैनिकांची आशीर्वाद आणि त्यांनी देवाजवळ सत्याचा विजय व्हावा अशी प्रार्थना केली होती. हा सत्याचा विजय झाला आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी जो हिंदुत्ववादी विचार सोडला होता, संजय राऊतांच्या सांगण्यावरून पक्ष रसातळाला नेत होते, त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी भगवंताचरणी प्रार्खना केली होती. हा बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे,” असेही ते म्हणाले.