- मोसीन शेख
मुंबई: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 34 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीचे 36 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आज सकाळपासून ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. यात पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांचे नाव सुद्धा चर्चेत होते. अखेर भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवणारे भुमरे यांना सकाळीच 'मातोश्री'वरून शपथविधीसाठी हजर राहण्याचे निरोप मिळाले होते. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून भुमरे यांची पक्षात ओळख आहे. गेल्या 31 वर्षापासून ते शिवसेनेत कार्यरत आहे. शिवसेना शाखाप्रमुख ते कॅबिनेट मंत्रीपद असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
भुमरे यांनी 1988 मध्ये पैठण तालुक्यातील पाचोड येथे शिवसेनेची शाखा स्थापन करून शाखाप्रमुख म्हणून प्रत्यक्षात राजकीय कामकाजाला सुरवात केली होती. त्यांनतर 1989 मध्ये पाचोड ग्रामपंचायतमधून ग्रा.प. सदस्यपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. पुढे त्यांनी 1992 ला पंचायत समिती निवडणूक लढवली व पैठण पंचायत समितीच्या उपसभापती त्यांची निवड करण्यात आली होती. याच काळात संत एकनाथ साखर कारखान्यावर संचालकपदी त्यांची निवड करण्यात आली.
त्यांनतर भुमरे यांना शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1995 पैठण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. तेव्हापासून 2009 सोडले तर भुमरे हे सलग पैठणमधून निवडणून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भुमरे हे पाचव्यांदा निवडणून आले आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय अनुभव लक्षात घेत पक्षाकडून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.