गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या कथित गद्दारीचा बदला भाजपा, देवेंद्र फडणवीसांनी साधारण दोन वर्षांपूर्वी घेतला खरा परंतु त्या उद्धव ठाकरेंना ते काही संपवू शकले नाहीत, अशी स्थिती एक्झिट पोलनी वर्तविली आहे. शिवसेनाच ठाकरेंकडून हिसकावून घेतली तर ठाकरे घराण्याचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा अंदाज बांधून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने बंड केले हे काही आता महाराष्ट्राला नवे नाही. परंतु, या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल पाहता उद्धव ठाकरेंना ना शिंदे ना भाजपा संपवू शकली असेच दिसत आहे.
शिवसेना पक्ष जरी एकनाथ शिंदेंकडे गेलेला असला तरी जनता ठाकरेंसोबत असल्याचेच हे आकडे सांगत आहेत. लोकसभेच्या एक्झिट पोलनुसार ठाकरेंना ९ ते ११ जागा मिळताना दिसत आहेत. शिंदेंनी ठाकरेंचे आमदार काढून घेतले, मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतली. खासदारही काढून घेतले. जे काही थोडे उरले होते ते देखील येतील असे दावे केले जात होते. परंतु, ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या साथीने पुन्हा उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंना राजकारणात परत शड्डू ठोकणे खूप गरजेचे होते. भाजपाने ज्या शिंदे आणि अजित पवारांच्या भरवश्यावर महाराष्ट्र सर करण्याचा प्रयत्न केला तो पूर्णपणे फसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात बिहारप्रमाणेच भाजपाला खूप नुकसान होताना दिसत आहे.
अख्खा पक्ष जरी शिंदेंच्या ताब्यात गेलेला असला तरी उद्धव ठाकरेंच्या मतांमध्ये फक्त साडेतीन टक्क्यांचा फरक दिसत आहे. तर अजित पवारांना ४ टक्के मते दिसत असून त्याच्या दुप्पट शरद पवारांना मते दिसत आहेत. यावरूनच भाजपा पक्ष फोडून देखील या दोघांना संपविण्यात सध्यातरी अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
भाजपला मिळत असलेल्या मतांमध्ये सव्वा टक्का फायदा होत आहे. मात्र, गेल्यावेळी जिंकलेल्या जागांपैकी एखाद दुसरी जागा कमी होत आहे. शिंदेंचेही ८-९ खासदार निवडून येत आहेत. परंतु असे असले तरी ते ठाकरेंना अस्तित्व दाखविण्यापासून रोखू शकलेले नाहीत.
ठाकरेंसोबत राहिलेले नेते चुकले की...ठाकरेंना जर हा विजय मिळाला तर त्यांच्यासोबत राहिलेल्या नेत्यांना पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, अशी परिस्थिती आहे. याचे बक्षीस या नेत्यांना पुढेही मिळण्याची संधी आहे. काही महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे. यावेळी ठाकरेंसोबत राहिलेल्या आमदारांना पुन्हा संधी मिळेल, परंतु जे आमदार शिंदेंसोबत गेले त्यांच्या जागीही नव्या बाजुला राहिलेल्या नेत्यांना संधी मिळणार आहे.