मुंबई - रत्नागिरीच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला २ महिन्यात फाशीची शिक्षा झाली असं विधान केले होते. या विधानानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आला. महायुती सरकारच्या काळात कोणत्या आरोपीला फाशी दिली हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे असं आव्हान विरोधकांनी केले होते.
राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री भरसभेत धडधडीत खोटे बोलतात असं म्हटलं. त्यांनी ट्विट केले की, शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त SIT ची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का?, मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्री महोदय ,बलात्कार सारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय तरी घेऊन नका असा घणाघात त्यांनी केला.
विरोधकांच्या याच आरोपांवर शिवसेनेकडून खुलासा करत त्या खटल्याची तारखेनुसार माहिती देण्यात आली आहे. आमच्या भगिनींच्या अंगावर हात टाकणाऱ्या, लहान मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या कुणालाही अभय मिळणार नाही. त्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. त्यासाठी रत्नागिरीच्या सभेत बोलताना न्यायालयाच्या एका आदेशाचा दाखलाही दिला. मात्र सभोवतालची, न्यायालयीन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसणारे विरोधक त्याचेही भांडवल करत आहेत. फाशीची शिक्षा झालेलीच नाही असं फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत असा पलटवार त्यांनी केला.
'तो' खटला कोणता?
मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला प्रकार मावळमध्ये घडलेला आहे. ६ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या एका संतापजनक प्रकरणात फास्ट ट्रॅकवर न्याय देण्यात आला. याचा घटनाक्रम खालील प्रमाणे
गुन्ह्याची तारीख - ०२/०८/२०२२एफआयआर दाखल करण्यात आलेली तारीख - ०२/०८/२०२२गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली तारीख - ०३/०८/२०२२आरोप पत्र दाखल करण्यात आलेली तारीख - १२/०९/२०२२तपास पूर्ण - एफआयआर दाखल झाल्यानंतर ४० दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आले - १६ / ३ / २०२३ ( ६ महिन्यांत)आरोपनिश्चिती झाल्यानंतर दोन महिन्यात साक्षी पुराव्यांची तपासणी सुरू - १२ / ०५ / २०२३निर्णयाची तारीख - २२ /०३ / २०२४
जलदगतीने चालवण्यात आलेल्या खटल्यात आरोपी तेजस दळवीला चार महिन्यांपूर्वी पुणे न्यायलयाने फाशी सुनावली आहे. महायुती सरकारच्या काळात गुन्हेगाराला अभय नाही. आमच्या बहिणी लाडक्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य होणार नाही. अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही म्हणजे नाहीच. विरोधकांनी दुर्दैवी प्रकरणाचे राजकारण करणे थांबवावे. न्यायासाठी पाठीशी उभे राहावे. राजकारण होतच राहील असा टोलाही शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे.