मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० च्या आसपास आमदारांनी बंड करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या त्या बंडानंतर आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू समर्थपणे मांडली आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांना शह देण्यासाठी शिवसेनेकडून मोठी खेळी खेळण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सावंतवाडी तालुक्यातील नेते चंद्रकांत गावडे यांना शिवसेने आज पक्षात प्रवेश दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत गावडे यांनी हातात शिवबंधन बांधले.
चंद्रकांत गावडे यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, चंद्रकांत गावडे यांनी आज मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधले. चंद्रकांत गावडे यांच्यासोबत त्यांचे पुत्र कौस्तुभ गावडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दीपक केसरकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र आता सावंतवाडीमध्ये काँग्रेसमधून एक मोठा नेता शिवसेनेत आल्याने शिवसेनेला बळ मिळाले आहे.