Maharashtra Politics: शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून अनेकांनी टीका केली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या टीकेचा समाचार घेत, तुम्ही ५० खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान ५० पेट्या तरी द्या, असा टोला सत्ताधारी शिंदे सरकारला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात केवळ २० मिनिटे शेतकऱ्यांसाठी दिलेत. त्यात ते काय काय पाहतात हे महत्त्वाचं आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. कुठल्याही मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकरी संकटात असताना मदत करण्याची भूमिका सत्ताधारी-विरोधक दोघांची असते. जी उद्धव ठाकरेंची मागणी असेल त्यावर तंतोतंत माहिती घेऊन पुढे कार्यवाही करू. आम्ही विरोधकांचा सन्मान ठेऊ. महत्त्वाच्या सूचना मांडल्यास त्यावर सरकार विचार करेल. अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरेंचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आला. त्याबद्दल धन्यवाद आहे. २० मिनिटे का होईना शेतकऱ्यांना भेटतायेत, असा टोला अब्दुल सत्तारांनी लगावला होता. यावरून चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.
तुम्ही ५० खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान ५० पेट्या तरी द्या
तुमचे काम फिरण्याचे आहे. ते तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्ही ५० खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान ५० लाख तरी द्या, असा खोचक टोला लगावत शेतकरी संकटात आहेत, मात्र सरकार स्वत:च्या गुंगीत आहे, अशी टीका चंद्रकात खैरे यांनी यावेळी केली. ६९ ठिकाणी फिरलो असे सत्तार सांगतात पण त्याचा उपयोग काय? शेतकऱ्यांना काय मदत केली. माझ्या पाया पडला मी प्रचाराला गेलो म्हणून निवडून आला. आता त्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे, असा पलटवार खैरे यांनी केला.
दरम्यान, अब्दुल सत्तारसारखा माणूस ज्याने उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले ते आता त्यांच्यावर टीका करत आहेत. ४ पक्ष फिरून आले. त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. आदित्य ठाकरे फिरलेत, आमदार, खासदार फिरले, मविआ नेते, विरोधी पक्षनेते राज्यभर फिरले. कितीही काय झाले तरी आता बस्स झाले. तोंड सांभाळा नाहीतर आम्ही कायदा दाखवून देऊ, असा इशारा खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"