जळगाव: एकीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना दुसरीकडे मात्र, महाविकास आघाडीतच बेबनाव असल्याचे सातत्याने समोर येत आहे. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. जळगावातील मुक्ताईनगरच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर नाराजी व्यक्त करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. तसेच मुक्ताई मंदिरातील ५ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधला. एकनाथ खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
खूप त्रास सहन केला, ठाकरे-पवारांनाच सांगतो
एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झाले त्रास सहन करणे, असा थेट इशारा सेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. एकनाथ खडसे यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्यावरून त्यांचे वैफल्य दर्शवते. हमी माझ्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरते. मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मतदारसंघात विकास खुंटला, मी विकास कामे करायला लागलो आणि त्यांना जिव्हारी लागले, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निधीचा पाठपुरावा केल्याचे एक पत्र दाखवावे, असे थेट आव्हान देत शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील हे खोटारडे आहेत. आम्हीच या कामांचा पाठपुरावा केला होता, असा हल्लाबोल करत एकनाथ खडसे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.