नागपूर - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारी मतदान होणार आहे. त्यात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नागपूरात शिक्षक मतदारसंघातून उभे राहिलेले शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेने नागपूरात रणनीती बदलल्याची चर्चा आहे.
त्यात मविआचा घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीनेही नागपूरात उमेदवार उभा केला आहे. या उमेदवाराबाबत संजय राऊतांनी आमदार कपिल पाटील यांना फोन केल्याची माहिती आहे. याबाबत कपिल पाटील म्हणाले की, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे हे नागपूर शिक्षण मतदारसंघातून उमेदवार आहेत. संजय राऊतांचा फोन आला होता. त्यांनी नागपूरची स्थिती विचारली. तेव्हा शिवसेना उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक सोप्पी जाईल असं सांगितले. राजेंद्र झाडे हे निवडून येणारे सर्वाधिक मजबूत उमेदवार आहेत. याची जाणीव आघाडीतल्या पक्षांना झाली असेल म्हणून त्यांचा फोन आला अशी माहिती कपिल पाटलांनी दिली.
तर शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. शिवसेनेने उमेदवारी मागे घेतली त्याचे स्वागत आहे. राजेंद्र झाडे यांच्या विजयाचा मार्ग आणखी मोकळा झाला आहे. याठिकाणी आघाडीतील घटक पक्षाचा एकही उमेदवार शिल्लक राहत नाही. मविआतील मतफुटीचा फायदा दुसऱ्यांना होऊ नये यासाठी शिवसेना हे पाऊल उचलत असेल तर स्वागत करायला हवे असं सांगत कपिल पाटलांनी आभार मानले.
बंडखोरी, नाराजीनाट्य यामुळे विधान परिषदेच्या ५ जागांची निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. नाशिकमध्ये २२ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतलीय. नागपूरात राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराने माघार घेतली नाही. सुधाकर आडबाले यांना काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत राजेंद्र झाडे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदारसंघातून कोण जिंकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.