ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - २३ जानेवारी १९२६ रोजी जन्माला आलेल्या बाळ केशव ठाकरे यांची ओळख बाळासाहेब ठाकरे आणि देशातील कोट्यवधी जनतेसाठी हिंदू ह्रदय सम्राट अशी राहिली आहे. प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
दी फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रातून व्यंगचित्रकार म्हणून करीअरला सुरुवात करणा-या बाळासाहेबांनी असंख्य राजकीय व्यंगचित्रे काढली. मार्मिक हे शिवसेनेचे पाक्षिक बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध होते. फटकारे या बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं आहे. काही काळ फ्री प्रेसमध्ये काम केल्यावर बाळासाहेबांनी नोकरी सोडून १९६० साली मार्मिक सुरू केले. तर शिवसैनिक हीच माझी शक्ती आहे आणि तेच माझा प्राण आहेत, असे कायम सांगत राहिलेल्या बाळासाहेबांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर दर दस-याला शिवाजी पार्कवर किंवा शिवसेनेच्या भाषेमध्ये शिवतीर्थावर बाळासाहेबांचे होणारे भाषण सगळ्यांसाठी कायम औत्सुक्याचा विषय राहिला. यंदा २०१२च्या दस-याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेब स्वत: येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या भाषणाची चित्रफित दाखवण्यात आली.
शिवसेनेचा जन्म
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काही नाव सुचतय का संघटने साठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दु-विधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित कधीच फ़िसकटले नाही.
ठाकरी भाषा
विरोधकांच्या मते शिवराळ मानल्या जाणा-या बाळासाहेबांच्या वक्तृत्वाचा उगम त्यांच्या वडीलांच्या प्रबोधनकार ठाक-यांच्या शैलीमध्ये आहे. बाळासाहेब अभिमानाने या शैलीला ही आमची ठाकरी भाषा आहे असे म्हणत. प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अत्यंत सक्रीय होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते मुंबई, परप्रांतीयांचे आक्रमण, मराठी माणसावरील अन्याय या विषयाला सातत्याने वाचा फोडत. बाळासाहेबांनीही आयुष्यभर याच भूमिकांचा पुरस्कार केला. हिंदुत्त्ववादी भूमिका घेतल्यानंतरही बाळासाहेबांनी आपले पहिले प्रेम मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच असल्याचे वारंवार सांगितले. प्रबोधनकारांच्या काळात व बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात परप्रांतीयांवरील रोख मुख्यत्वेकरून गुजराती, मारवाडी व दाक्षिणात्यांवर होता, जो नंतरच्या काळात उत्तर भारतीयांविरोधात वळला. हिंदुत्ववादाची भूमिका स्वीकारल्यानंतर बाळासाहेबांनी अत्यंत जहाल भाषेमध्ये मुसलमानांवर टीकास्त्र सोडले, परंतु आपला विरोध पाकप्रेमी मुसलमानांना असल्याचा आणि अब्दुल कलामांसारख्या राष्ट्रवादी मुसलमानांवर आपला रोष नसल्याचेही त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केले.
आपल्याला जे सांगायचे आहे ते थेट सांगायला माध्यमाची गरज ओळखून बाळासाहेबांनी १९८९मध्ये सामना हे दैनिक सुरू केले आणि शेवटपर्यंत सामनाचे संपादक बाळ ठाकरे असे नाव झळकत राहिले. महाराष्ट्रात वाढणारी हिंदी भाषकांची संख्या आणि शिवसेनेने स्वीकारलेले हिंदुत्वाचे धोरण लक्षात घेऊन बाळासाहेबांनी दोपहर का सामना हे हिंदी वृत्तपत्रदेखील सुरू केले.
रिमोट कंट्रोल
शिवसेनेमध्ये अदगी साधी गोष्टदेखील बाळासाहेबांच्या मर्जीशिवाय झाली नाही. शिवसेना-भाजप युतीच्या हातात राज्याची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री झालेले मनोहर जोशी असोत किंवा नारायण राणे असोत, निर्णय बाळासाहेबांच्या आदेशानुसारच व्हायचे. यास बाळासाहेबदेखील म्हणत, की रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे. शिवसेनेमध्ये लोकशाही नाही हे अत्यंत स्पष्टपणे सांगणारे बाळासाहेब बेधडकपणे जगाने नावे ठेवलेल्या हिटलरचे कौतुक करत. मी हिटलरचे कौतुक करणा-यांपैकी आहे असे अभिमानाने सांगणारे बाळासाहेब म्हणत, हिटलरने ज्यूंचे शिरकाण केले ते आपल्याला मान्य नाही. परंतु हिटलरने जसा जर्मनी चालवला तसाच पोलादी हाताने भारत चालवण्याची गरज असल्याचे ते सांगत. हिटलर एक कलाकार होता, मी देखील एक कलाकार आहे असे सांगत हिटलरकडे संपूर्ण राष्ट्राला बरोबर घेऊन जाण्याचा दुर्मिळ गुण होता आणि हिटलर हा एक चमत्कार होता असे उद्गार बाळासाहेबांनी काढले होते.
कम्युनिस्टांचा अस्त, शिवसेनेचा उदय
शिवसेना स्थापनेच्या काळात म्हणजे १९६६च्या सुमारास, मुंबईमधल्या गिरणी कामगारांवर कम्युनिस्टांचा पगडा होता. शिवसेना सुरुवातीपासून कम्युनिस्टविरोधी होती. कम्युनिस्टांना मुंबईत हद्दपार करण्यासाठी काँग्रेसनेही शिवसेनेला रसद पुरवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुंबईमधल्या गिरण्यांमधून शिवसेनेने व भारतीय कामगार सेनेने कम्युनिस्टांना जवळपास हद्दपार केले आणि मुंबईच्या मराठी कामगारांमध्ये शिवसेना व बाळासाहेब अनभिषिक्त सम्राट झाले. मुंबईमध्ये जरी शिवसेनेचा जन्म झाला असला आणि तिची मुळे मुंबईत रुजली असली तरी शिवसेनेला पहिले राजकीय यश ठाण्यात मिळाले. सत्तरच्या दशकात शिवसेनेने ठाणे महापालिका काबीज केली. हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यानंतर शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि १९९५मध्ये युतीला पहिल्यांदा महाराष्ट्राची सत्ता मिळाली. १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात सेना-भाजपची सत्ता होती. बांगलादेशी मुसलमानांविरोधात बाळासाहेब ठाक-यांनी कठोर भूमिका घेतली होती, आणि देशातील चार कोटी बांगलादेशी मुसलमानांना परत बांगलादेशात धाडण्यात यावे अशी सातत्यपूर्ण मागणी त्यांनी केली.
पाकिस्तान क्रिकेट डिप्लोमसीला विरोध
पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांच्याबरोबर क्रिकेट सामने खेळवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा बाळासाहेबांनी कायम विरोध केला. विशेषत: भारतामध्ये होणा-या दहशतवादी कारवायांनंतर त्यांनी पाकिस्तानला येथे खेळू देणार नाही असे जाहीर केले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या एका सामन्याआधी तत्कालिन शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी वानखेडेची खेळपट्टी खणली आणि तेव्हापासून पाकिस्तानचा मुंबईत सामना झालेला नाही. येत्या डिसेंबरमध्ये पाकिस्तान भारत दौ-यावर येत असला तरी मुंबईमध्ये सामना आयोजित करण्यात आलेला नाही. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देऊ नये या भूमिकेचाही बाळासाहेबांनी वारंवार पुनरुच्चार केला.
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले.