मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी भाषेत चांगलेच सुनावले आहे. जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता. कोणीही येथे राहून नाटके करण्याची किंवा रडायचे सोंग आणू नयेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्येही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या बंडखोरांचा उल्लेख चोर असा केला. हा खेळ काही काळ सुरु राहील. मी सुद्धा आमदार आणि खासदारांना खोल्यांमध्ये कोंडून घेतले असते. मात्र आम्ही तसे केले नाही. तसे वागणे लोकशाहीला धरुन ठरले नसते. आता ते सत्तेची फळे उपभोगतील. मात्र ज्या दिवशी भाजपला हे लोक आता उपयोगाचे नाहीत असे वाटेल तेव्हा त्यांना बाजूला केले जाईल. सध्याचा हा कठीण काळ जाऊ देणे हाच मार्ग आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आता तुम्ही रडायचे सोंग आणू शकत नाही
मी पदाधिकाऱ्यांना अजूनही सांगतोय की, जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता. कोणीही येथे राहून नाटके करण्याची किंवा रडायचे सोंग आणू नयेत. तुम्ही येथे सर्व फायदे घेतले. त्यामुळे आता तुम्ही रडायचे सोंग आणू शकत नाही. त्यांनी माझ्याकडे पदांची मागणी केली असती तर मी ती दिली असती. मात्र तुम्ही काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी शांत बसणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देईन, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
५० लाख प्रतिज्ञापत्रांचा टप्पा पूर्ण करायचाय
सध्या सभासद संख्या वाढवण्यावर आणि प्रतिज्ञापत्रांवर लक्ष केंद्रीत करुया. राज्याच्या राजकारणात काय सुरु आहे, याकडे लक्ष देऊ नका. लोक आपल्यासोबत आहेत. त्यांना आपल्याबद्दल सहानुभूती आणि प्रेम आहे. बंडखोरांबद्दल लोकांच्या मनात संताप आहे. शिवसेनाला पुन्हा नव्याने उभे करण्याची हीच संधी आहे. आपण ५० लाख प्रतिज्ञापत्रांचा टप्पा पूर्ण केला की आपण मुंबईत एकत्र बैठकीसाठी भेटूयात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.