मुंबई - अडीच-तीन वर्षापूर्वी आम्हाला गृहित धरून राजकारण केले होते. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊच शकत नाही. शरद पवारांचा लौकीक तुम्हाला माहित्येय. कधीपण दगा देतील असं मला काहींनी सांगितले. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. आता एकूण राजकारण जे सुरू आहे ते दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणारी औलाद सत्तेवर येऊ बघतेय ती गाडून टाकण्याची गरज आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गरिबांचा जो भ्रमनिराश झालेला आहे तो दूर करण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टीला उशीर होत नाही. सुरुवात करण्याची जी गरज असते ती वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीने झालीय. गेल्या लोकसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीचं प्रकाश आंबेडकरांनी नुकसान केले असेल पण आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. भाजपासोबत आमची युती होती. त्यांनी स्वार्थापायी ही युती तोडली. भाजपानं दगाफटका केला. आत्ताचं भाजपा नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्या पक्षातीलच नेतृत्वाची एक फळी कापून टाकली आहे. राजकारण विरोधक, शत्रू नको असं समजू शकतो पण भाजपाला मित्रही नकोत असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
तसेच राजकारणात नेमकं भाजपाला काय साधायचं? आज देशाची वाटचाल सरळ सरळ हुकुमशाहीकडे चाललेली दिसते. जी न्याव्यवस्था, न्यायप्रणाली आहे त्यांना दमदाट्या केल्या जातायेत. सगळ्या संस्था बुडाखाली घ्यायच्या आहेत. मग देशात लोकशाही कुठे राहिली? राज्यघटनेत हे बसतंय का? आम्ही देशाचे तारणहार, घटनेचे रक्षक आहोत असा भ्रम निर्माण करून त्याच्या आडून आपल्याला हवं ते करायचं हे जे चालले आहे ते मोडून काढण्यासाठी आम्ही युती केलीय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
प्रबोधनकारांच्या विचारांवर युतीप्रबोधनकारांचे जे हिंदुत्व होते त्यावर चालण्याचे धोरण उद्धव ठाकरेंनी घेतलंय. समाज सुधारण्यासाठी काही भूमिका कडवटपणाने घ्याव्या लागतात. प्रबोधनकारांनी ती घेतली होती. हीच लाईन पुढे घेऊन जाणार आहोत. आरएसएस आणि भाजपाचं जे नकारात्मक हिंदुत्वाचं राजकारण आहे त्यापेक्षा समाजव्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे. ती कुठल्या मुद्द्यावर येईल त्याची मांडणी आमच्या युतीतून करणार आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.