मुंबई - मुळातच माझी वर्षावर जाण्याची इच्छा होती का? याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. याचा अर्थ आता मुख्यमंत्रीपद गेले म्हणून वाईट बोलतोय असं नाही. ते एक वैभव आहे. मुख्यमंत्रिपदाचा आणि 'वर्षा'चा मी अजिबात अनादर करणार नाही. ती एक वेगळी वैभवशाली वास्तू आहे. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद हे एक वैभवशाली पद आहे. जबाबदारीचं पद आहे. त्याचा पूर्ण आदर ठेवून सांगतो, मी कधीच वैयक्तिक अशी स्वप्ने बघितली नव्हती असं रोखठोक भाष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१९ च्या निवडणूक निकालानंतर जे काही घडले ते ज्यांना आपण विश्वासघातकी म्हणू त्यांना ते पूर्ण माहित्येय कसा पाठीत वार केला गेला आणि कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडीला आपल्याला जन्म द्यावा लागला होता. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. नंबर दोनचं पद दिलं होतं. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच घात केला असा आरोप त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
तसेच त्यांना शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेसोबत ठरवलं होतं अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद. तेच तर तुम्ही आता केलंत आणि ते जर तेव्हा केलं असतं तर निदान पाच वर्षात भाजपाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद मिळालं असतं. ही आता सोंग ढोंग करतायेत ती आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिलं ती करावी लागली नसती आणि आता ते म्हणतायेत आमची शिवसेना पण ही शिवसेना नाहीये हे सगळं तोडफोड करून त्यांचं समाधान होत नाही कारण त्यांना शिवसेना संपवायची आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, शिवसेना आणि संघर्ष हे एकमेकांच्या पाचवीला पुजले आहेत. शिवसेना ही एक तळपती तलवार आहे. ती जर म्यानात ठेवली तर ती गंजते. त्याच्यामुळे ती तळपलीच पाहिजे आणि तलवार तळपणं म्हणजे संघर्ष आलाच. याचा अर्थ तलवारीने वार करा असं म्हणणं नाही. पण संघर्षासाठीच तर शिवसेना जन्माला आली. त्यामुळे मराठी माणसासाठी, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्याच्यानंतर हिंदुत्वासाठी शिवसेना लढली. जिथे अन्याय तिथे वार हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.