मुंबई: शिंदे गट आणि शिवसेनेतील कुरघोड्या वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या शिवसेनेतील अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, अधिकाधिक लोकांना पक्षात आणणे, पक्षात टिकवणे आणि पक्ष संघटना मजबूत करणे यावर मोठाच भर दिला जात आहे. चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्यासह आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. तसेच ज्यांना मोठे केले ते निघून गेलेत. आता सामान्य लोकांना अतिसामान्य करायचे आहे, त्यांची नसलेल्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे, पण आपल्याला असलेल्या शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असे आवाहनही शिवसेना कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, असे म्हणत शिंदे गटाला इशाराही दिला आहे.
नीलम गोऱ्हेंच्या पक्षप्रवेशीची सांगितली आठवण
शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे यांना शिवसेनेचे उपनेते पद देण्यात आले आहे, उद्धव ठाकरे यांनीच ही घोषणा केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नीलमताई गोऱ्हे यांचा २४ वर्षांपूर्वी मला निरोप आला की त्यांना भेटायचे आहे. त्यावेळी त्यांच्याशी ३ तास चर्चा केली. मला वाटले यांना यायचे तर नाही. मग कशाला चर्चा पण मग त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांच्या परिवर्तन होऊन त्या सेनेत आल्या. अनेक नेत्यांनी साथ सोडली असताना आता नीलम गोऱ्हे याच ठाकरेंसोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, सुषमा अंधारे यांच्यामुळे पुण्यात शिवसेनेला मिळणार आक्रमक चेहरा मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.