मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठा यात्रेच्या माध्यमांतून विस्कटलेल्या पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेतील बंडानंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आमदारांनी बंडखोरी केली असली तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार असून ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आगामी महाराष्ट्र दौऱ्याचे त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते.
शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करणार
एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्याच नावाचा वापर करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करण्यसाठी तसेच पक्षाला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी आणि आखणी सध्या शिवसेना भवनात सुरू आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेदेखील असतील.
दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर यांसह राज्यातील अनेक ठिकाणांहून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यात शिवसेनेतील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जातो. अमरावतीमध्येही शिवसेनेला खिंडार पडले आहे. शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. उपमहापौर ठाणे रमाकांत माडवी यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला. हा मतदार संघ अमरावतीचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा आहे.