मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांच्यातील लढत चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांच्या पाठिशी ताकद उभी करणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिवसेनेचे पारडे जड दिसत आहेत. परंतु, शिवसेनेची जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली अभद्र युती अंबादास दानवे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपला आणि विशेष करून रावसाहेब दानवे यांना जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत भावाला जिल्हा परिषद अध्यक्ष केले. तर औरंगाबादमध्ये देखील शिवसेनेने भाजपला दूर ठेवत काँग्रेसला जवळ करून सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
भाजपच्या नुकत्याच झालेल्या शक्तीप्रमुखांच्या मेळाव्यात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपला असंतोष व्यक्त केला. शिवसेनेला मदत करण्यासाठी कधीही तयार आहोत. परंतु, आधी शिवसेनेने जालना आणि औरंगाबादमधील काँग्रेससोबतची युती तोडावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे अंबादास दानवे- बाबुराव कुलकर्णी लढत एकतर्फी वाटत असली तरी चुरशीची होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अंबादास दानवे युतीचे उमेदवार असून वरिष्ठ पातळीवरून भाजपकडून सदस्यांना व्हीप देण्यात येऊ शकतो. अशावेळी शिवसेनेसोबत दगाफटका झाल्यास, पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भाजप सदस्यांची अडचण झाली आहे. दुसरीकडे कुलकर्णी आपल्या पद्धतीने मतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यात त्यांना किती यश येते हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.