वडखळ : पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागा व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी शिवसेना, काँग्रेसची युती झाल्याची घोषणा, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.शिवसेना नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली प्रस्थापितांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही युती के लीअसून, या युतीमध्ये भाजपाही असेल. पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी शिवसेना दोन, तर काँग्रेस तीन जागा लढविणार आहे. तर पंचायत समितीच्या दहा जागांपैकी शिवसेना चार जागा, तर काँग्रेस सहा जागा लढविणार आहे. वडखळ जिल्हा परिषदेची जागा शिवसेनेची असून, पेणमध्ये भाजपाला जिल्हा परिषदेची जागा देण्याची शक्यता नसून, पंचायत समितीच्या जागा दिल्या जातील. शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार आहेत. विरोधक ज्याप्रमाणे सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकारण करतात, त्याचप्रमाणे शिवसेनाही राजकारण करीत आहे.रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना ३४ जागा जिंकणार असल्याचे शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले. तर प्रस्थापितांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जनतेला अभिप्रेत असलेली सत्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आणण्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ही युती केली असल्याचे काँग्रेसचे युवा नेते वैकुंठ पाटील यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे नरेश गावंड, काँग्रेसचे वैकुंठ पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पेणमध्ये शिवसेना, काँग्रेसची युती
By admin | Published: January 07, 2017 3:01 AM