मविआत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; विरोधी पक्षनेतेपदावर दावा, आज होणार बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:44 AM2022-08-11T10:44:51+5:302022-08-11T10:45:22+5:30

शिवसेनेने न विचारताच परस्पर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

Shiv Sena-Congress clash of Opposition party leader post claim, Maha Vikas Aghadi meeting to be held today or tomorrow | मविआत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; विरोधी पक्षनेतेपदावर दावा, आज होणार बैठक

मविआत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; विरोधी पक्षनेतेपदावर दावा, आज होणार बैठक

googlenewsNext

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील कुरघोडी चव्हाट्यावर येत आहे. विधानसभेत संख्याबळ पाहता विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे गेले. अजित पवार हे विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस-शिवसेना आमनेसामने आल्याचं चित्र आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दोन्ही बाजूने दावा करण्यात आला आहे. 

याबाबत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावा हा आमचा आग्रह आजही आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे आहे. विधान परिषदेत उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. आता संख्याबळ पाहता समसमान संख्या आहे. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं. 

तर आज किंवा उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यात अशोक चव्हाण उपस्थित राहतील. शिवसेनेने न विचारताच परस्पर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला. मित्रपक्ष आहोत तर एकमेकांशी बोललं पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही हे दुर्देव आहे अशा शब्दात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. 

विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड
विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असून विरोधी पक्षनेतेपदी मराठवाड्यातील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपसभापतींकडे केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेचे शिफारस पत्रही उपसभापती निलम गोऱ्हे यांना देण्यात आले. त्यानंतर उपसभापती कार्यालयाकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड केल्याचं जाहीर करण्यात आले. मात्र याच निवडीवरून आता महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगलं आहे. 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं असं पत्र काँग्रेसनं आधीच दिले होते. महाविकास आघाडीत सध्याच्या घडीला राष्ट्रवादीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते, शिवसेनेकडे विधान परिषदेतील उपसभापतीपद आहे. त्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच द्यावं असा दावा काँग्रेस नेते करत होते. परंतु शिवसेनेने अंबादास दानवे यांची नियुक्ती करून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसविरुद्ध शिवसेना असा वाद समोर येणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. 

Web Title: Shiv Sena-Congress clash of Opposition party leader post claim, Maha Vikas Aghadi meeting to be held today or tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.