मुंबई : शिवसेनाकाँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे. गेल्या पंधरवड्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडीओ, वक्तव्यांचे फोटो व्हायरल करून ते कसे काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत होते हे दाखविले जात होते. मात्र, इतिहासात डोकावल्यास शिवसेना काँग्रेसची मैत्री ही काही आजची नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मैत्रीला तब्बल चार दशकांचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या सुवर्णकाळाचा इतिहास आहे.
शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती. तर शिवसेनेने डाव्या विचारांच्या पक्षांना, उमेदवारांना तब्बल 22 वेळा मदत केली होती.
वैभव पुरंदरे यांच्या बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय या पुस्तकात शिवसेनेच्या पहिल्या प्रचारसभेला तेव्हाचे काँग्रेसचे मोठे नेते रामाराव आदिक सहभागी झाले होते. रामाराव आणि बाळासाहेब ठाकरे मित्र होते. ठाकरे यांनी तेव्हा सांगितले होते की कम्युनिस्टांना हरविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तर एप्रिल 2004 मध्ये सुहास पळशीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही याची उल्लेख आहे. राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सांगतात की, 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे समर्थन होते. यामुळे नंतर शिवसेनेला वसंत सेना असेही म्हटले जाऊ लागले. 1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक कामराज यांच्या काँग्रेससोबत मिळून लढविली होती. नंतर इंदिरा काँग्रेसचा गट पुढे आला.
बाळासाहेब ठाकरेंवरील पुस्तकात त्यांनी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली त्याचे उघडपणे समर्थन केले होते. ठाकरे तेव्हा मी लोकशाही नाही तर ठोकशाहीवर विश्वास ठेवतो, असे म्हणत होते. तर थॉमस हेनसेन यांनी लिहिलेल्या 'वेजेस ऑफ व्हायलेंस : नेमिंग अँड आयडेंटिटी इन पोस्टकोलोनियल बॉम्बे' नुसार इंदिरा यांनी आणीबाणी अशासाठी लागू केली कारण देशात अस्थिरता पसरली होती. आणि हाच एकमेव उपाय असल्याचे बाळासाहेब म्हणाले होते.
1977 मध्ये बाळासाहेबांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा यांना समर्थन दिले होते. याच वर्षी झालेल्या लोकसभेची निवडणूक झाली होती. यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता. 1980 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान बनताच महाराष्ट्राचे सरकार बरखास्त केले आणि पुन्हा निवडणूक घेतली. यावेळी अंतुलेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आले होते. बाळासाहेबांनी या निवडणुकीत उमेदवारच उभे केले नव्हते आणि काँग्रेसला पाठिंबा दिला होता. बदल्यात काँग्रेसने शिवसेनेच्या प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक यांना विधानपरिषदेवर पाठवलं.
राष्ट्रपती निवडीवेळीही दोनदा शिवसेना काँग्रेसच्या मदतीला धावलेली आहे. 2007 मध्ये एनडीएचे भैरोसिंह शेखावत यांच्याऐवजी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर 2012 मध्येही शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता.