नागपूर : शिवसेनेचे नगरसेवक बंडू तळवेकर यांच्या कारने एका ६० वर्षीय महिला व ६ महिन्यांच्या चिमुकलीला चिरडले. यासोबतच अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यात चिमुकलीच्या आईचा ही समावेश आहे. ही घटना यशोधरानगर परिसरातील वनदेवीनगर येथील शीतलामाता मंदिरजवळ शनिवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांनी कारवर दगडफेक करून काचा फोडल्या. तर, या संतप्त जमावाला पांगवण्यासााठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शीतलामाता मंदिरजवळील झोपड्यांमधील काही महिला अंगणात बसून बोलत होत्या. त्यावेळी निवडणुकीचा प्रचार करीत असलेली पांढऱ्या रंगाची कार अनियंत्रित होऊन त्यांच्या दिशेने आली आणि महिलांना धडक देत ती थेट एका झोपडीत घुसली. यात अकीला बी. ताज मोहम्मद (३८) या गंभीर जखमी झाल्या, तर त्यांची ६ महिन्यांची चिमुकली आशिया बी. ऊर्फ मुस्कान ताज मोहम्मद व सासू इस्लाम बी. शेख मोहम्मद (६०) यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
शिवसेना नगरसेवकाच्या कारने दोघांना चिरडले
By admin | Published: February 13, 2017 3:24 AM