संजय राऊत यांचे मोठे संकेत; UPA मध्ये शिवसेना सहभागी होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 09:35 AM2021-12-09T09:35:06+5:302021-12-09T09:36:06+5:30
Sanjay Raut On Shiv Sena UPA : आम्ही महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मिनी-युपीए चालवत आहोत - संजय राऊत
Sanjay Raut On Shiv Sena UPA : नुकतीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली. यादरम्यान, युपीएला (UPA) पुनरुज्जीवीत केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख यांच्यातील दरी सध्या वाढत असून याच दरम्यान राऊत यांचं वक्तव्य समोर आलंय. दरम्यान, काँग्रेसमध्ये क्षमताही नाही आणि विरोधकांचं नेतृत्व करण्याचं मनही नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
राहुल गांधींसोबत बैठकीत त्यांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा सल्लाही राऊत यांनी दिला. शिवाय युपीएला पुनरुज्जीवीत करण्याची विनंती करत शिवसेनादेखील युपीएमध्ये सहभागी होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. “आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक मिनी युपीए चालवत आहोत. आपल्याला केंद्रीय स्तरावरही अशा प्रकारची व्यवस्था करायला हवी,” असं राऊत म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं.
उद्धव ठाकरेंना कल्पना दिली
“सर्वांना आमंत्रित करा असं मी राहुल गांधींना सांगितलं. कोणीही स्वत:हून येऊन सहभागी होणार नाही. त्यांच्याकडून भेटीचं निमंत्रण आल्यानंतर आम्ही त्यावर विचार करू. मी ही बाब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्या प्रकारे लोक राहुल गांधीच्या बाबत विचार करतात ते योग्य नाही. राहुल गांधीदेखील चांगला विचार करतात. त्यांच्या पक्षात काही कमतरता आहे. त्यांनी ते मुद्दे सोडवले पाहिजे, असंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ज्यावेळी मी राहुल गांधींसोबत चर्चा करण्यास जात होतो तेव्हा याची कल्पना शरद पवार यांना दिली होती आणि बैठकीच्या नंतरही त्यांच्याशी चर्चा केल्याचं राऊत म्हणाले.