मुंबई: मेहक प्रभू या मुलीने झळकविलेल्या ‘फ्री कश्मीर’ फलकाबाबतही विरोधी पक्षनेत्यांनी सारासार विचार न करता सरकारवर टीका केली आणि नंतर मेहक प्रभूने नेमकं काय केलं, हे स्पष्ट झाल्यावर ते तोंडावर आपटले. विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावणे, स्वतःची विश्वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते असं म्हणत विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज असल्याची टीका सामानातून शिवसेनेनं भाजपावर केली आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. विरोधी पक्षाचे इतके अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही. फडणवीस यांचे हे असे का झाले आहे, ते महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे. सत्ताधाऱयांवर ते रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके वाईट कुणालाच वाटत नसेल, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला.
नागरिकता सुधारणा कायदा व ‘जेएनयू’तील निर्घृण हल्ला प्रकरणानंतर देशभरातील तरुण वर्ग संतापून रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन केले. त्यात एका मुलीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा कागदी फलक घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र तासाभरात वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर ती मुलगी आली व तिने विरोधी पक्षाच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. मुळात ही मुलगी मुसलमान किंवा कश्मिरी नव्हती. शुद्ध मराठीत तिने आपले नाव मेहक प्रभू असे सांगितले. त्यामुळे पहिल्या फटक्यातच भगतगण कोलमडले असल्याचा खोचक टोला शिवसनेने भाजपला लगावला.
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयमाची व विरोधी पक्षाची प्रतिष्ठा राखण्याची अपेक्षा जनता करीत आहे. फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर संयमाचा बाम चोळून काही काळ शांत राहायला हवे. तसेच त्यांनी 'विरोधी पक्षाची जबाबदारी व कर्तव्य' अशा विषयांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करून त्यात सहभागी व्हायला हवे. ज्याला ‘कौन्सिलिंग’ म्हणतात अशा समुपदेशनाची आज विरोधी पक्षाला गरज असल्याची टीका सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर करण्यात आली आहे.