Maharashtra Politics: शिवसेना फोडणे हे भाजपचे ‘मिशन’ होते व ते पूर्ण झाल्याचा आनंद गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते; पण आम्ही तो फोडला, असेही महाजन म्हणाले. जळगावात ज्या व्यासपीठावर महाजन यांनी हे सत्यकथन केले त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. शिंदे यांनी एक प्रकारे महाजन यांच्या विधानाचे समर्थन केले. ‘महाराष्ट्रातील सत्तांतर सहज घडले नाही व त्यामागे भाजपचे कठोर परिश्रम होते. अखेर मिशन यशस्वी झाले,’ असे महाजन म्हणाले. यावरुन शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर फडणवीस वगैरे लोकांनी हात वर केले व या फुटीशी आमचा संबंध नसून ही शिवसेनेची अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगितले. मात्र गिरीश महाजन यांनी आता हा दावा खोटा ठरवला. भाजपचे शिवसेना फोडण्याचे मिशन होते म्हणून सध्याचे सरकार बनविण्यात आले. भाजप म्हणे गंगेसारखा आहे. त्यात डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका, अशी ऑफर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीच आहे. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले, अशी घणाघाती टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे.
चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे
शरद पवार यांनी कारस्थान करून शिवसेना फोडली असे बेइमान गटाचे आमदार बोलत होते. चाळीस आमदार व त्यांचे नेते हे स्वतःच विक्रीसाठी बाजारात उभे होते. भाजपने बोली लावली व ते फुटले. शिंदे व त्यांच्याबरोबरचा गट हा बऱ्याच काळापासून फुटण्याच्या तयारीत होता व उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा मुहूर्त त्यांनी पकडला. बाकी सर्व भाजपने ठरवल्याप्रमाणे केले. शिवसेना फोडायचीच हे भाजपने ठरवूनच टाकले होते व त्या पद्धतीने सापळा रचला. भाजपला महाराष्ट्र फोडायचा आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही शिवसेनेने केला आहे.
शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर झाल्याची ही सुरुवात
शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र कमजोर करता येणार नाही याची खात्री असल्यानेच महाजन म्हणतात त्याप्रमाणे, शिवसेना फोडण्याचे ‘मिशन’ भाजपने पूर्ण केले. शिवसेना फोडताच बाजूच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे महाराष्ट्रात घुसले व त्यांनी सोलापूर, सांगलीतील अनेक गावांवर दावा सांगितला. शिवसेना फोडण्याचे मिशन पूर्ण होताच महाराष्ट्रातील अनेक बडे उद्योग व गुंतवणूक गुजरातमध्ये पळविण्यात आली व राज ठाकरेंसारखे नेते ‘दोन-चार उद्योग महाराष्ट्रातून गेले म्हणून काय बिघडले?’ अशी भाषा बोलू लागले. शिवसेना फोडल्याने महाराष्ट्र बाणा कमजोर झाल्याची ही सुरुवात आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
चाळीस जण ‘दाम’ लावून फुटले, क्रांतीची वगैरे भाषा झूठ
चाळीस जण ‘दाम’ लावून फुटले. क्रांतीची वगैरे भाषा झूठ आहे. महाजन यांनी चाळीस खोकेबाज आमदारांचे बिंगच फोडले व तेही मुख्यमंत्र्यांसमोर. महाराष्ट्रातील फुटिरांच्या घरापर्यंत ‘गंगा’ नेण्याचे काम भाजपने केले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एक मत बाद करण्यासाठी पाच-दहा कोटींचे गंगास्नान घडवले गेले व त्या गंगेचे पाणी जामनेरमधून आले हे खरे नाही काय? भाजपचे मिशन हे असेच आहे. त्याने गंगा साफ मैली करून टाकली. मोदी तरी काय करणार? असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"