Maharashtra Politics: सध्या ज्या पद्धतीचा राज्यकारभार देशात सुरू आहे, त्यामुळे जगात आपल्या देशाची बदनामी व लोकशाहीची ‘छीःथू’ सुरू आहे. राहुल गांधी यांना बनावट खटल्यात शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द करणे ही लोकशाहीची हत्या आहे व जगातील अनेक देशांनी त्यावर चिंता व्यक्त केली. मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. जे पंतप्रधान स्वतःचे ‘शिक्षण’ लपवत आहेत, त्यांची ‘उगाच’ बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? मोदींचे कर्मच त्यांच्यावर उलटले आहे. त्यांनी जे पेरले तेच उगवले आहे. Entire Political Science ची डिग्रीही त्याच पेऱ्यातून उगवली आहे. या सगळ्यावर उत्तर देण्याची ५६ इंची छाती आहे काय? असा खडा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे.
विनोदी किंवा गमतीशीर भाषणे करण्यात पंतप्रधान मोदी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. अमेरिकेच्या ट्रम्प यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. आता मोदी यांनी भोपाळला जाऊन आणखी एक विनोदाचा भोपळा फोडला आहे. मोदी म्हणतात, माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी देशात आणि देशाबाहेर काहींशी संगनमत करून ‘सुपारी’ दिली आहे. मोदी पुढे असेही म्हणतात की, माझी कबर खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या विरोधात कटकारस्थाने रचली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण तुफान हास्यास्पद व खोटारडेपणाचा कळस आहे, अशी घणाघाती टीका सामना अग्रलेखातून केली आहे.
लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी?
बदनामीची ‘सुपारी’ घेतलीय अशी टोचणी त्यांना का लागलीय याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतःच केले पाहिजे. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी जाहीरपणे एका मुलाखतीत व भाषणात सांगितले होते की, मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही व नंतर अचानक मोदी यांची ‘एमए’ची पदवी (Entire Political Science) समोर येते व अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदींची ‘डिग्री’ फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण मोदी यांना ‘‘तुमची इयत्ता कंची?’’ असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जाते. मुळात यात लपविण्यासारखे काय आहे? मोदी जी ‘डिग्री’ दाखवत आहेत ती बनावट आहे, असा मोठा दावा शिवसेनेने केला आहे. कोणी त्यांच्या डिग्रीवर आणि शिक्षणावर प्रश्न विचारले की, पहा, माझी बदनामी सुरू आहे, असे सांगणे म्हणजे ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळण्यासारखेच आहे. मोदींनी गुजरातच्या स्टेशनवर चहा विकला की नाही? या रहस्याप्रमाणेच मोदींची डिग्री हासुद्धा एक रोमांचक रहस्यपट आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"