मुंबई: सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. उलट आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अधिक तीव्र होताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार असून, राजकीय वर्तुळात मोठा धुरळा उडू शकतो, असे सांगितले जात आहे. यातच आता शिवसेनेने भाजपवर बोचरी टीका केली असून, भाजपवाल्यांनी आता २०२९ ची तयारी करावी, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे नेते नितेश राणे, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासहीत भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंत्र्यांचा उल्लेख करत शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेने, देवाच्या चरणी तरी खरे बोला, असा खोचक टोला लगावला आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही
देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ ची तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. भारतीय जनता पक्षाच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का? नारायण राणे यांच्यापासून अनेक नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात अनधिकृत इमले उभारून कायदे धाब्यावर बसवले आहेत. मारताय त्यावर तुमचे नौटंकी छाप हातोडे? त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची वक्तव्ये व अशा हातोड्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. २०२४ बरोबरच त्यांना २०२९ चीही तयारी करावी लागेल. समझनेवाले को इशारा काफी है!, अशा इशारा शिवसेनेने दिलाय.
भाजपाशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा
देशातील भाजपाशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पाहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल. उत्तर प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पन्नासेक मंत्र्यांचा शपथविधी करून घेतला. त्यातील २२ मंत्र्यांवर भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे नोंदवली आहेत व त्या मंत्र्यांना किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोव्यातही वेगळी स्थिती नाहीच. हे असले गुड गव्हर्नन्स तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे.
दरम्यान, शरद पवारांसारखा नेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सांगलीतील स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास जाण्याआधी विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे कसले आले गुड गव्हर्नन्स? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय? अशी विचारणा यावेळी करण्यात आली आहे.