Maharashtra Politics: प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यातील बरीच नावे ही ‘संघ’ परिवाराशी संबंधित आहेत व त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. दिवंगत मुलायमसिंग यादव यांनाही पद्मविभूषण सन्मान देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली हे महत्त्वाचे, असे म्हणत वीर सावरकर आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडल्यावरून शिवसेनेने पद्म पुरस्कारांवरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपला वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो, अशी घणाघाती टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून केली आहे.
दिवंगत मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण
दिवंगत मुलायमसिंग यादव यांनाही पद्मविभूषण सन्मान देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. अयोध्येत आता राममंदिर उभे राहात आहे व त्याच राममंदिराच्या नावावर प्रत्येक निवडणुकीत मते मागितली गेली, पण १९९० साली झालेल्या अयोध्या आंदोलनात त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंग यादव यांनी करसेवकांवर निर्घृणपणे गोळय़ा चालवल्या. त्यात शंभरांवर साधू-संत, करसेवक मारले गेले व अनेकांची प्रेते तर शरयू नदीत फेकण्यात आली. करसेवकांच्या रक्ताने तेव्हा शरयू लाल झाली. त्या हत्याकांडानंतर भाजप व संघपरिवार मुलायमसिंग यांचा उल्लेख ‘मौलाना मुलायम’ असा करू लागले. त्याच मुलायम यांना आता प्रखर हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारने ‘पद्म विभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला, या शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, मुलायमसिंग हे समाजवादी चळवळीचे मोठे नेते. पण अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळ्या चालवून जो रक्तपात घडविला, त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता. ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय? असा सवाल करत, बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असा हल्लाबोल शिवसेनेने केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"