मुंबई - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत झाली. त्यानंतर आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या नेत्यांची सभा होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार हेदेखील उपस्थित असणार आहेत. या सभेवरून शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. शिवतीर्थावर आयोजित केलेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रेची नौटंकी म्हणजेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्त्ववादी विचारांना मूठमाती देण्याची कृती उबाठा गट करीत आहेत असा टोला आमदार मनिषा कायंदे यांनी लगावला.
मनिषा कायंदे म्हणाल्या की, शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान असून शिवतीर्थ म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे समीकरण आहे. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या हुकूमशाहीच्या विरोधात मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली. आज संध्याकाळी स्वातंत्रवीर सावरकर यांना माफीवीर संबोधणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा स्वातंत्रवीर सावरकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासमोर होणार असल्याने उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना या स्मारकात घेऊन जातील का ? असा सवाल शिवसेना सचिव, प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी विचारला आहे.
तसेच "मेरा नाम सावरकर नही...असे छातीठोकपणे म्हणणारे काँग्रेस नेते राहुल गांधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला अथवा जयंतीला साधे ट्विट करत नाहीत. तेच राहुल गांधी जर आज शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर चुकून गेलेच तर तो हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जाणूनबुजून केलेला अपमान असेल अशी खंत शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली.
मिलिंद देवरांनीही ठाकरेंना डिवचलं
मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, आज रात्री शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत. त्या म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..., सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील... मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही..., आम्ही समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करतो..., ३७० कायदा रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. एकूणच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार असल्यावरून देवरांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य करत आज शिवाजी पार्कवर 'या' पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत असा टोला लगावला.