नवी दिल्ली: व्हॅलेंटाईन वीक संपत आला, प्रॉमिस डे, हग डे गेला, व्हॅलेंटाईन डे आला तरी, युतीचं मनोमीलन काही झालेलं नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरुच आहे. शिवसेना आणि भाजपाचे नेते एकमेकांना इशारे देत आहेत. मात्र पडद्याआड युतीची बोलणीदेखील सुरू आहे. मात्र अद्यापही या चर्चांना मूर्तस्वरुप आलेलं नाही. एका बाजूला शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये युतीची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेनं नवी मागणी केली आहे. शिवसेनेच्या नव्या मागणीमुळे नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत असणारे पक्ष त्यांच्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. 'एनडीएनं 2019 मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे युतीच्या बोलणीत नवं वळण येऊ शकतं.
पीएम तुमचा, सीएम आमचा; शिवसेनेच्या मागणीनं युतीत नवा लोच्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 1:30 PM