सत्तारांच्या मनधरणीसाठी खोतकरांना यावं लागलं; औरंगाबादेत शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:53 PM2020-01-04T14:53:36+5:302020-01-04T14:54:23+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तारांना मंत्रीपदही दिले. मात्र स्थानिक नेते आणि सत्तार यांच्यात सुसुत्रता दिसत नाही. किंबहुना सत्तारांची नाराजी त्यामुळं तर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वकाही सुरळीत होतं. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार होतच पक्षांतर्गत भांड्याला भांडे लागण्यास सुरुवात झाली आहे. आधी राष्ट्रवादी आणि आता शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडली आहे. या घटनेमुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर तातडीने सत्तारांची समजूत काढण्यासाठी औरंगाबादेत दाखल झाले होते. त्याचवेळी औरंगाबादेतील नेते सत्तारांची मनधारणी करण्यासाठी का गेले नाही, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे औरंगाबादेत शिवसेनेमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यावरून सत्तार नाराज असल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद द्यायला नको, शिवसेनेचे स्थानिक निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे आणि राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्रीपद हवंय यावरून सत्तार नाराज असल्याची शक्यता आहे. औरंगाबादेत चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे हे शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. मात्र यांच्यापैकी कोणीही सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी फिरकले नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तारांना मंत्रीपदही दिले. मात्र स्थानिक नेते आणि सत्तार यांच्यात सुसुत्रता दिसत नाही. किंबहुना सत्तारांची नाराजी त्यामुळं तर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.