नागपूर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिवसेनेने भाजपासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत शिवसेनेने भाजपाच्या नेत्यांवर अनेकदा थेटपणे टीका केली असली तरी संघावर मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून टीका करणे टाळले जात असे. परंतु परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यामुळे भविष्यात शिवसेना संघाच्या धोरणांवरही टीका करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास भारतीय लष्करापेक्षा जलदगतीने सैन्य उभारणी करू शकतो, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर रावते यांनी भागवतांना उपरोधिक टोला लगावला. त्यांनी म्हटले की, आता पाकिस्तानची भीती बाळगण्याची कोणतीही गरज नाही. तसेच सीमेवर लढण्यासाठी सैन्य भरतीची आणि सैनिकांना प्रशिक्षित करण्याची गरज नाही. फक्त एक शिट्टी मारायचा अवकाश की, सीमेवर लाखोंची फौज जमेल, असे रावते यांनी म्हटले. सीमेवर लढणारे सैनिक जीवाची पर्वा न करता शत्रूशी लढतात. मोठ्या परिश्रमातून आणि मेहनतीतून सैन्य दलाची उभारणी करावी लागते, असे रावते यांनी सांगितले.
एक शिट्टी मारली तर लाखो सैनिक सीमेवर जमतील; रावतेंचा उपरोधिक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:10 AM