मुंबई : तुम्ही अंगावर येत असाल तर शिंगावर घ्यायची आमची तयारी आहे; पण मर्दासारखे लढा, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सच्या मागे लपून वार का करता? हिंमत असेल तर माझे सरकार पाडून दाखवा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केला. या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. ‘तुम्ही चिरकत राहा, माझा वाडा चिरेबंदी आहे, तुमचीच डोकी फुटतील,’ असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले.
ठाकरे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र पुढे नेत असताना काहींच्या पोटात दुखतंय. एकतर्फी प्रेमातून निराश प्रेमवीर प्रेयसीवर ॲसिड फेकतो तसे काही लोक महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रतिमेवर ॲसिड फेकत आहेत. ठाकरे परिवार, शिवसैनिकांवर आरोप करणाऱ्यांना शिवसैनिक जागच्या जागी ठेचतील.
त्यांना सत्ता हवी असेल तर मी देऊन टाकतो. पण आम्ही जसे काम करतोय, तसे तुम्ही करून दाखवा. त्यांनी आमचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. सरकार पडत नाही म्हणून ‘छापा, काटा’चा खेळ सुरु आहे. ‘छापे’ टाकायचे आणि ‘काटा’ काढायचा असे चालले आहे. ही थेरं फार काळ टिकत नाहीत. सत्तापिपासूपणाचे व्यसन त्यांना लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींनी न झुकण्याची जिद्द कायम ठेवली, तीच आपल्या रगारगात आहे आणि ती दाखवून देवू. पश्चिम बंगालने त्यांचे पार्सल परत पाठवले, तसेच इथूनही ते परत पाठवण्याची धमक शिवसैनिकांमध्ये आहे.
दिल्लीच्या तख्ताला ताकद दाखवू- केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकारांवर राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे अशी मागणी करुन ठाकरे यांनी केंद्रातील सध्याचे सरकार राज्यांमध्ये घटनाबाह्य ढवळाढवळ करीत आहे. असेच सुरू राहिले तर घटनेची दुर्घटना होईल, असा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘केंद्राइतकीच राज्येही सार्वभौम असल्याचे म्हटले होते याची आठवण त्यांनी करून दिली. हर, हर महादेवची ताकद काय असते ते दिल्लीच्या तख्ताला दाखवावीच लागेल, असेही ते म्हणाले.
हिंदू तितुका मिळवावा- हिंदुत्वाची शिडी करून वर गेलेले लोक मराठी माणसांमध्ये जातीपातीच्या भिंती उभ्या करतील व सत्तेची गाजरे खात बसतील. तुम्ही मराठी माणसांची, हिंदूंची एकजूट बांधून ‘मराठा तितुका’प्रमाणे हिंदू तितुका मिळवावा, असेही ठाकरे म्हणाले.- या मेळाव्याला रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, लीलाधर डाके, दिवाकर रावते, खा. संजय राऊत, खा. विनायक राऊत, खा. अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.