'उद्याचा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. पंतप्रधान मोदी यांनी उत्सव साजरा करा, असे सांगितले. घराघरांत तिरंगे वाटले गेले, पण कोणत्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव? काँग्रेसचे स्वातंत्र्यलढय़ातले योगदान विसरता येत नाही आणि देशाला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले, असे ठामपणे सांगणारे लोक देशाच्या सत्तेवर आहेत,' असे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.
'टिळकांपासून नेहरूंपर्यंत काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी सर्वाधिक संघर्ष केला. तुरुंगवास भोगला, पण काँग्रेसला पूर्णपणे बाजूला ठेवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. औपचारिकता म्हणून उद्या 15 ऑगस्टला गांधीजींचे नाव फार तर घेतले जाईल, पण स्वातंत्र्यलढय़ाशी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांचा काडीमात्र संबंध नाही हे बिंबविण्याचे हरतऱहेचे प्रयत्न गेल्या 7-8 वर्षांत सुरू आहेत,' असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या रोखठोकमधून सरकारवर जोरदार निशाणा साधला.
काय म्हटलेय लेखात?'स्वातंत्र्यासमोर आज आव्हानात्मक परिस्थिती आहे. देशातली घाण साफ करण्यासाठी मोदी आले, पण उपयोग झाला नाही. काही उद्योगपती, व्यापाऱयांना अटक झाली, पण जे खरेच तुरुंगात असायला हवेत ते सर्व भाजपचे देणगीदार व सरकारचे आश्रयदाते बनलेले आहेत. देशाची निरंकुश सत्ता मोदी-शहांच्या हातात आज आहे, पण स्वातंत्र्याची पहाट काळय़ाकुट्ट ढगांनी झाकली आहे. सार्वभौम लोकशाहीचा देव्हारा रिकामा आहे,' असे शिवसेनेने म्हटले आहे.
'निवडणुका होत आहेत, पण लागलेल्या निकालांवर लोकांचा विश्वास नाही. तिरंगा फडकतोय, पण संविधान पायदळी आहे. देशात अशी भयग्रस्त, अराजकसम स्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती. तरीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्य व लोकशाही श्वास घेण्यासाठी धडपडत आहे. हे कसले स्वातंत्र्य? 2014 नंतर जे स्वातंत्र्य मिळाले ते हेच आहे. तरीही हे स्वातंत्र्या, तुझी व्याख्या सांग! आझादीच्या अमृत महोत्सवात तरी तू बोल, तुझी व्याख्या सांग,' असेही त्यात नमूद करण्यात आले आहेत.