राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ काही बॅनर राजस्थानात लावण्यात आले होते. यावेळी बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात अशा पदव्या लावण्याची हिंमत नाही कारण लोक जोड्याने मारतील असं म्हणत टीका केली होती. यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी जोरदार निशाणा साधलाय."ज्यांनी हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब म्हटलं, ज्यांना हिंदूहृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेब ठाकरे यांना लावायला लाज वाटत होती. म्हणून जेव्हा तुम्ही सत्तेत होता त्यांना वंदनीय म्हटलं गेलं. मला आमच्या महाज्ञानी, विश्वप्रवक्ते राऊतांना विचारायचंय जेव्हा त्यांना जनाब संबोधलं गेलं तेव्हा काहीच वाटलं नाही का?" असा सवाल शितल म्हात्रेंनी केला."जेव्हा त्यांना जनाब संबोधलं गेलं तेव्हा तुम्ही गप्प बसला होता. आता जे एकनाथ शिंदेंवर प्रेम करतात अशा काही शिवसैनिकांनी त्यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी लावली असेल तर तुमच्या पोटात का ढवळलं गेलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीही स्वत:ला पक्षाचे प्रमुख असंही म्हटलं नाही. त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते असं पद दिलंय. त्यामुळे आम्हाला या पदाची कधीही गरज नव्हती. हिंदुहृदयसम्राट हे एकमेव बाळासाहेब ठाकरेच आहेत. त्यामुळे उगीच दोरीला साप म्हणून धोपटू नये आणि हिंदूहृदयसम्राट ही उपाधी तुम्ही सत्तेत असताना का नाकारली याचं उत्तर जनतेला द्यावं," अशी मागणीही त्यांनी केली.काय म्हणाले होते राऊत?"एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट असतील पण त्यांनी असे काय महान कार्य केलं आहे ते आम्हाला पाहावं लागेल. सन्मानीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलं आहे. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला. बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोडी केल्या नाहीत, बेईमानी केली नाही. आता बेईमान आणि गद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पाहावं लागेल," या शब्दांत संजय राऊत हल्लाबोल केला होता.
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा 'जनाब' म्हटलं गेलं तेव्हा महाज्ञानी..," शितल म्हात्रेंचा राऊतांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 9:12 AM