उद्धव ठाकरे यांचा २३ जानेवारी रोजी पक्षप्रमुख पदाची मुदत संपत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. दरम्यान, त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्या अशी मागणी केल्याची माहिती समोर आली होती. यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टोला लगावला.
“ही त्यांची धडपड आहे. खरंतर याचा विचार त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाताना करायला हवा होता. पण अजूनही त्यांना कळत नाहीये की राष्ट्रवादी त्यांना संपवायला निघाली आहे,” असं केसरकर म्हणाले. “खऱ्या अर्थानं आम्ही शिवसेना जीवंत ठेवली आहे, बाळासाहेबांचे विचार जीवंत ठेवले आहेत. एक ना एक दिवस त्यांना याची जाणीव होईल. आपण राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसून काय गमावलं याचीही जाणीव होईल,” असंही ते म्हणाले.
३० जानेवारी रोजी धनुष्यबाण कोणाला दिला जाईल याचा निकाल आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला विश्वास आहे निकाल आमच्या बाजूनं लागेल,” असं केसरकर म्हणाले.