...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:34 AM2024-09-21T11:34:55+5:302024-09-21T11:35:23+5:30
ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांना उमेदवारी देऊन महायुतीचं नुकसान करू नका अशी मागणी या नेत्याने वरिष्ठांकडे केली आहे.
हिंगोली - वसमत विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व सध्या राजू नवघरे यांच्याकडे आहे. ते महायुतीचे असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. मात्र याच मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे राजू चापके हे निवडणुकीसाठी तयारी करत आहे. राजू चापके हे तालुकाप्रमुख म्हणून गेल्या ५ वर्षापासून हा मतदारसंघ बांधत आहेत. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता. तू मतदारसंघात काम कर, ही जागा आपल्याला लढायची आहे असं शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राजू चापके यांनी सांगितले.
राजू चापके यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शब्दानंतर मी या मतदारसंघात तयारी करत आहे. शब्दाप्रमाणे ते नक्कीच हा मतदारसंघ मला लढवण्यासाठी संधी देतील. महायुतीचा घटक पक्ष म्हणून इथल्या विद्यमान आमदारांनी कधीही आम्हाला सोबत घेतले नाही. कधीही चर्चा केली नाही. शिवसेना-भाजपाला कधी विश्वासात घेतले नाही. उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही बोलावले नाही. मुंबईला गेले की अजितदादा आणि मतदारसंघात आले की शरद पवार अशी त्यांची संभ्रमावस्था आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच राष्ट्रवादीतील ही नुराकुस्ती आणि मॅनेज कार्यक्रम आहे. मतदारसंघातील जनतेला हा काय घोळ आहे हे माहिती आहे. विधानसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या माध्यमातून लढवणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना वारंवार या गोष्टी सांगितल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत इथल्या आमदारांनी महायुतीविरोधात काम केले. या गोष्टी मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. आपल्या कार्यकर्त्यावर जो अन्याय होतोय, या गोष्टीला थारा देणं बंद करावे. शिवसेनेसारखीच भाजपा कार्यकर्त्यांची अवस्था आहे असा आरोप राजू चापके यांनी केला.
दरम्यान, महायुतीकडून चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांना जर उमेदवारी मिळाली तर ते चुकीचे ठरेल. ते कधीही मतदारसंघात महायुतीचे घटक म्हणून वावरलेच नाहीत. महायुतीच्या कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटले नाहीत. महायुतीचा मतदार कदापि त्यांच्यासोबत जाणार नाही. महायुतीच्या सर्व्हेतही ते तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असतील. जर तरीही महायुतीने त्यांना उमेदवारी दिली, तर ज्याचा पराभव अटळ आहे त्याला तिकीट देऊन महायुतीचे नुकसान करू नये अशी मी विनंती करतो. राजू नवघरे यांचे काम करणं आमच्याकडून शक्य नाही असंही राजू चापकेंनी स्पष्ट भूमिका मांडली.