मुंबई : गेल्यावेळी सत्तेत असून सुद्धा शिवसेना विरोधकाची भूमिका बजावताना पाहायला मिळत होती. मात्र आता मुख्यमंत्रीपदच शिवसेनेच्या ताब्यात असल्याने, सत्तेत आलेल्या शिवसेनेकडून आगामी निवडणुका लक्षात घेता, 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर दिला जात आहे. या उद्देशाने सर्वच ठिकाणी जिल्हा प्रमुख व आमदार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
अकोला जिल्ह्यात सुद्धा जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याच्या अनुषंगाने पक्षातील उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या मुद्यावरही प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती असून, निवडणूक लढणाऱ्या संभाव्य उमेदवारांसाठी 'मायक्रो प्लॅनिंग' करण्यावर भर देण्याची सूचना यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केली.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीच्या बॅनरखालीचं काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आत्तापासूनच तयारी सुरु करण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोल्यात मंगळवारी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी सुमारे ४२२ पेक्षा अधिक उमेदवारांनी अधिकृत अर्ज स्वीकारले.
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काटेकोर नियोजनाची खूप गरज असते. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वसात घेणे गरजेचे असते. शिवसेनेकडून यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीतील मुद्दे काय असणार यासाठी बैठका घेतल्या जात आहे.