औरंगाबाद - प्रति शिवसेना भवन बांधून आम्ही शिवसैनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. मात्र मुंबईतील शिवसैनिक हे सहन करून घेणार नाही यासाठी शिवसैनिकांना मार खावा लागला किंवा जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल मात्र शिवसेना भवनाची कोणी विटंबना केलेले शिवसैनिक कधीच सहन करून घेणार नाही अशा शब्दात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांना खोक्याने पैसे देण्यात आले आहे म्हणून यांना प्रति शिवसेना भवन बांधण्याचे वेड लागले आहे. मात्र शिवसेना भवन हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी बांधले असून ते शिवसैनिकांसाठी मंदिर आहे. यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचीही चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच शिंदे गटात जे आमदार गेलेत त्यांना मराठवाड्यात आडवं करण्याचं काम आम्ही करू. अंबादास दानवे यांच्यासोबत मिळून आम्ही एकत्रपणे काम करू. संजय शिरसाटांची शिवसेनेत येण्याची इच्छा मान्यच करणार नाही. रात्री कुठल्या धुंदीत ते बोलले असतील माहिती नाही. १९९२ मध्ये ते शिवसेना सोडून गेले होते. तेव्हा बाळासाहेबांवर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यांना परत घेण्यात आले त्यावेळी आमचा विरोध होता. आता उद्धव ठाकरेंवर टीका केल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ असंही खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी आणि हिंदुंना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना भवनाची उभारणी केलीय. शिंदे गटाकडे कोट्यवधी रुपये आलेत. कुठून आले? सगळे पैशाने करायला लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन बांधले ते आमच्यासाठी मंदिर आहे. त्याच भवनातून आमदार, खासदार झाले. शिवसेना भवनाची प्रतारणा करू नका. मुंबईतील शिवसैनिकांना हे सहन होत नाही. ते आंदोलन करतील, मार खातील, जेलमध्ये जातील. त्यांची सहनशक्ती संपत आली आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.