मुंबई - Sanjay Raut on Chhagan Bhujbal ( Marathi News ) राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक वावड्या उठत आहेत. भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात असून लवकरच ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा आहे. त्यातच भुजबळ शिवसेना ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परततील असंही सांगितले जाते. मात्र छगन भुजबळ काँग्रेस, त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेत, हा त्यांचा मोठा प्रवास आहे. त्या प्रवासात शिवसेना खूप मागे राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात शिवसेना पुढे आहे. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद नाही, चर्चा नाही आणि होण्याची शक्यता नाही असं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची कालपासून अफवा आहे. परंतु ते कोणत्या वाटेने येत आहेत हे आम्हाला दिसलेले नाही. छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, त्याला एक कालखंड झाला आहे, आता त्यांनी स्वतःचा मार्ग निवडलेला आहे त्यांची एक वेगळी भूमिका आहे. भुजबळांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका आता मेळ खाणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पेरून, अफवा पसरवून महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या गोंधळ उडवायचा असेल त्यापलीकडे अशा बातम्यांना आम्ही जास्त काय महत्त्व देत नाही असं त्यांनी सांगितलं.
त्याशिवाय छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणीही भेटलेलं नाही, चर्चा झालेली नाही आणि होणार नाही. त्यांच्या मनातली खदखद ही त्यांच्या पक्षाची खदखद आहे. त्याच्याशी आमच्या शिवसेनेचा काय संबंध? त्यांनी त्यांची खदखद त्यांच्या पक्षांच्या नेत्यांपुढे त्यांचे नेते - आता अजित पवार आहेत, त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत, त्यांचे नेते प्रफुल पटेल आहेत त्यांच्यासमोर मांडली पाहिजे असा टोलाही संजय राऊतांनी छगन भुजबळांना लगावला.
दरम्यान, अडीच वर्ष ज्यांनी शिवसेनेचा उभा दावा मांडला, शिवसेना फोडली. महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवला त्यांच्याशी आता कोणताही संबंध, संवाद राहिलेला नाही. राहणार नाही. गेली अडीच वर्षात शिवसेना त्यांच्याशिवाय पुढे गेली, हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसतेय. ९ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मतांनी पडल्या हे खरं असलं तरी आम्ही नऊ जागा निवडून आणल्या अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी? असा सवाल करत संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचं म्हटलं.
जे सोडून गेले, ते पुन्हा नको
आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली ती अशा बेईमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसांची गद्दारी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीने ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि उद्धव ठाकरे यांनी ती त्याही पुढे नेली असं राऊतांनी सांगितले.