ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - आगामी पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोर कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. नाराज कार्यकर्त्यांची बंडाळी मोडून काढण्यासाठी शिवसेनेतर्फे त्यांच्यासमोर संघटनेतील विविध पदांची लालूच दाखवली जात आहे. नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले तरी ७ तारखेपर्यंत ते अर्ज माघारी घेतले जाऊ शकतात. त्यामुळे याच वेलेत त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी आणि मतांचं विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेने अटोकाट प्रयत्न सुरु केले आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला असून ते या बंडखोरांशी चर्चा करत आहेत.
दरम्यान प्रभादेवी भागात सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याला उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या महेश सावंत यांनी काल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाने त्यांना विभाप्रमुखपद देऊ केले आहे. तर, अभ्युदयनगर मध्ये बंडखोरीच्या तयारीत असणारे इच्छुक जयसिंग राठोड यांना आधीच प्रभारी पक्षप्रमुखाचे पद देण्यात आले.
दरम्यान शिवसेनेकडून वेगवेगळ्या पदांच्या ऑफर देण्यात येत असल्या तरी अजूनही काही ठिकाणी बंडखोरी सुरु आहेत. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या विरोधात शिवसेनेच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे.