शिवसेनेकडून राहुल गांधींचे कौतुक, अयोध्येतील निकालानंतर 'सामना' रंगला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 08:00 AM2019-11-11T08:00:44+5:302019-11-11T08:01:21+5:30
बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या, आता राष्ट्रीय मुसलमानांनी मिटवाव्यात.
मुंबई - राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी भाजपा आणि शिवसेनेतील वाद देशाच्या चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे भाजपाने सर्वात मोठा पक्ष असतानाही आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगत, शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या 27 वर्षांपासून सुरु असलेल्या राम मंदिराच्या न्यायालयीन लढाईनंतर अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा वाद संपुष्टात आला आहे. मात्र, या राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, हा निकाल आला. त्यामुळे सर्वच पक्षांकडून सावध भूमिका घेत, या निकालाचे स्वागत करण्यात आले. आता, या निकालानंतर शिवसेनेनं राहुल गांधींचं कौतुक केलं असून पंतप्रधान मोदींचा उल्लेखही केला नाही.
'आपल्या मित्रपक्षाला आणि विशेषत: त्यातील काही निवडक नेत्यांना प्रचंड अहंकाराने पछाडले असून, शिवसेनेचा केवळ वापर करून घेण्याचे त्यांचे धोरण आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका करतानाच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार स्थापन करण्याचा मानस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. तर, खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेस राज्यातील जनतेच्या विरोधी नाही, असे म्हणत काँग्रेसचे गोडवे गायले आहेत. त्यानंतर, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून आज राहुल गांधींच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांचं कौतुक करण्यात आलंय. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचा उल्लेखही करण्यात आला नाही.
बाबराच्या खुणा आधी शिवसैनिकांनी मिटवल्या, आता राष्ट्रीय मुसलमानांनी मिटवाव्यात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे या निर्णयाचे स्वागत केले. अयोध्येचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, त्याचे स्वागत करू असे राहुल गांधी म्हणाले. हा सामंजसपणा आहे, हा सामंजसपणा औवेसीसारख्या नेत्यांनी दाखवायला हरकत नव्हती, असे म्हणत सामनातून राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले. मात्र, या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेखही सामनातून करण्यात आला नाही. उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून मोदी सरकारकडे राम मंदिराची मागणी अनेकदा केली आहे. पण, निकालानंतर मोदींचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी स्थापन होऊन, सरकार बनेल, अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. त्यात, एनडीए सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलंय.
बहुमत सिद्ध करू
भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्याने दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केले आहे. बहुमत सिद्ध करण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.