ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - दोन हात करण्याची हिंमत दाखवण्याचे आव्हान देणाऱ्या शिवसेनेला आम्ही विधानसभेत विधानसभेत हिंमत दाखवलीय, असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज लगावला. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात भाजपाला दोन हात करण्याची हिंमत दाखवण्याचे आव्हान केले होते.
भाजपचे नेते शिवसेनेनेवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसले तरी महापालिका निवडणुकीत युतीची शक्यता भाजप नेते नाकारत नाहीत. आजही युतीबाबत विचारले असता स्वपक्ष वाढवण्याची तयारी मी करत आहे. स्वबळाची निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे मोघम उत्तर देत युतीची शक्यता शेलार यांनी कायम ठेवली आहे.
यावेळी भाडेकरारावरील भूखंडांच्या नुतनीकरणाचे धोरण दप्तरी दाखल करून मित्र पक्षाला धक्का देणाऱ्या शिवसेनेचा भाजपने आज समाचार घेतला. हे धोरण मंजूर झालल्यास अशा भूखंडांवर असलेल्या चाळी व दुकानांच्या पुनर्विविकासाचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र सुधार समितीमध्ये तोंड शिवून बसलेल्यांनी पालिका महासभेत शिमगा का केला? कोणत्या बिल्डरची तर सुपारी घेतली नाही ना? असा थेट हल्ला भाजपने चढवला आहे.
सुधार समितीचे अध्यक्ष व भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या द्वैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी सुधार समितीमध्ये मंजूर भाडेकरारचे धोरण पालिका महासभेत दप्तरी दाखल कसे झाले, याबाबत विचारले असता शेलार यांनी शिवसेनेवर तोफ डागली. हे धोरण दप्तरी दाखल केल्यामुळे चार हजार भूखंडांचा विकास रखडला आहे. यामध्ये ८० टक्के मराठी वस्तींचा समावेश आहे. घरासाठी केलेले काही बांधकाम दंड भरून त्यांना सुरक्षित करता येणार होते, असा दावा शेलार यांनी केला.
यामुळे घर सुरक्षित करण्याचा मराठी माणसाची संधी हुकली. तसेच यातून पालिकेला मिळणाऱ्या महसुलावरही पाणी फेरले आहे. जास्तीत जास्त घरांची निर्मिती व्हावी अशी भाजपाची इच्छा आहे. यामुळे घरांचे दर कमी होतील. मात्र बिल्डरने बांधलेल्या घरांचे दार यामुळे घाटातील म्हणून तर हा प्रस्ताव अडकवण्याची सुपारी बिल्डरकाढून घेतली आहे का? असा संशय शेलार यांनी व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे. परंतु याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल असा त्यांनी सुचित केले. (प्रतिनिधी )