शिवसेनेने उचलला भाजपमधील आयारामांच्या पाहुणचाराचा भार !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:38 PM2019-10-02T14:38:02+5:302019-10-02T14:38:28+5:30
शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.
मुंबई - निष्ठावंत आणि आयारामांचा संघर्ष भाजपमध्ये वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याची पूर्वकल्पना असल्यामुळेच शिवसेनेने युती करताना सौम्य भूमिका घेतली आहे. किंबहुना भाजपमध्ये आलेल्या आयारामांच्या पाहुणचाराचा भारच शिवसेनेने उचलला आहे. खुद्द सामनातून शिवसेनेने याची कबुली दिली आहे.
शिवसेनेने युतीसाठी घेतलेल्या भूमिकेवर सामनामधून स्पष्टीकरण दिले. युतीत शिवसेनेला 124 आणि भाजपला 164 जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. आग्रलेखात म्हटलं की, युती म्हटलं की देवाण-घेवाण आली. परंतु, यावेळी शिवसेनेला देवाण अधिक करावी लागली. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षातील दिग्गज नेते भाजपमध्ये आले आहेत. या नेत्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर भाजपला मोठा घास देणे आवश्यक असून तो आम्ही मान्य केल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
यामुळे भाजपने शिवसेनेच्या जीवावर आयारामांचा पाहुणचार करण्याचा बेत आखला होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्या सर्वांना सामावून घेताना भाजपच्या नाकी नऊ येत आहेत. अशा स्थितीत शिवसेनेकडून वाढवून घेतलेल्या जागांवर आयारामांना संधी मिळत आहे.
शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.