गृहखातं शिवसेनेलाच; राष्ट्रवादीची अर्थ खात्यावर बोळवण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 12:52 PM2019-12-12T12:52:02+5:302019-12-12T12:52:44+5:30
शिवसेनेने गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर राष्ट्रवादीची बोळवण अर्थखात्यावर करण्यात आली आहे. तर महसूल खातं काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
मुंबई - राज्यातील जनतेने कोणत्याही एका पक्षाला बहुमत न देता त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, असा कल विधानसभा निवडणुकीत दिला. अशा स्थितीत सोबत निवडणूक लढलेले शिवसेना-भाजप सरकार स्थापन करणार अशी स्थिती होती. मात्र भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून एकमत न झाल्याने युती फिस्कटली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. मात्र या सरकारचे अद्याप मंत्रीपद वाटपावरून एकमत झाले नसून त्यामुळे खातेवाटप रखडले आहे. मात्र ज्या मंत्रीपदावरून गाडी अडली होती, ते गृहमंत्रीपद अखेर शिवसेनेला मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मंत्रीपदांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र खातेवाटप कसं राहिल हे निश्चित नव्हते. राज्याच्या गृहमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला होता. आता गृहमंत्रीपद शिवसेनेलाच मिळणार असल्याचे समजते. गृहखात्यासाठी राष्ट्रवादी पक्ष आग्रही होता. आघाडीच्या काळात राष्ट्रवादीकडेच गृहखातं होते. त्यामुळे यावेळीही राष्ट्रवादीकडे राहिल अशी चर्चा होती.
दरम्यान शिवसेनेने गृहखातं आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे. तर राष्ट्रवादीची बोळवण अर्थखात्यावर करण्यात आली आहे. तर महसूल खातं काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगण्यात येते. गृहखात्याचा निकाल लागल्यामुळे आता उर्वरित खातेवाटप लवकरच होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.