- बाळकृष्ण परब शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंदुत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेचं हिंदुत्व हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सेक्युलर पक्षांसोबत महाविकास आघाडी स्थापन केल्यापासून शिवसेनेचं हिंदुत्व मवाळ झाल्याचा शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचा आरोप काही काळापूर्वीपर्यंत शिवसेनेचा मित्र असलेल्या भाजपाच्या नेत्यांकडून वारंवार होत आहे. त्यातच महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत सेक्युलर भूमिका घ्यायची की हिंदुत्व जपायचं? अशा द्विधावस्थेत शिवसेना सापडल्याचं शिवसेनेकडून विविध विषयांवर घेतली जाणारी भूमिका आणि शिवसेना नेत्यांच्या विधानांवरून दिसत आहे.
खरंतर कट्टर, प्रखर, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष अशी शिवसेनेची बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनची ओळख आहे. बाळासाहेबांच्या काळात हिंदू आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेएवढी आक्रमक भूमिका कुठलाही पक्ष संघटनेला घेणे शक्य झाले नव्हते. अगदी राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्वाच्या रथावर स्वार होऊन स्वबळावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपालाही एवढे आक्रमक होणे त्याकाळी जमत नव्हते. दहशतवादी, पाकिस्तान, बांगलादेशी घुसखोरांपासून ते देशातील मुस्लिम कट्टरतावाद्यांपर्यंत सर्वांविरोधात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना घेत असलेल्या टोकाच्या आक्रमक भूमिकेमुळे वैचारिक जगतामध्ये शिवसेनेची ओळख कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशी होती.
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरही शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका कायम होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपाशी असलेली युती तोडली. मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या तिढ्यामुळे शिवसेनेने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रिपद मिळवले. ही महाविकास आघाडी आकारास येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष सेक्युलर विचारांवर ठाम राहिले. तर शिवसेनेला आपण घटनेच्या चौकटीत हिंदुत्वाचे पालन करू असे मान्य करावे लागले. तेव्हापासूनच शिवसेनेची हिंदुत्वाबाबतची भूमिका मवाळ झाली, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. तसेच महाविकास आघाडीमधील ऐक्य टिकवण्यासाठी शिवसेनेने आपले हिंदुत्व काहीसे सौम्य केल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जातं आहे. त्यामध्ये गेल्या दोन सव्वा दोन वर्षातील शिवसेनेने हिंदुत्वाबाबत घेतलेल्या भूमिकांमुळे काहीसे तथ्य असल्याचे दिसते.
तपशीलवार विचार करायचा झाल्यास ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना कमालीची आक्रमक भूमिका घेत असे त्याच राम मंदिराच्या प्रश्नावर महाविकास आघाडी झाल्यावर शिवसेना म्हणावी तशी व्यक्त झाली नाही. उलट मंदिराचे भूमिपूजन त्यासाठी निधी गोळा करण्याची प्रक्रिया यावर शिवसेनेकडून टीका झाली. अगदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही भागात त्रिपुरातील घटनांवरून उसळलेल्या जातीय दंगलीवेळीही शिवसेनेची भूमिका ही तिच्या आधीच्या भूमिकांना छेद देणारी होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे शिवसेनेसाठी पूजनीय. एकेकाळी मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातील सावरकरांच्या नावाची पाटी हटवल्यावर खुद्द बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले गेले होते. मात्र महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांपर्यंत अनेकांनी सावरकरांबद्दल अनुद्गार काढल्यानंतर शिवसेनेला त्यांच्याबाबत ठाम भूमिका घेता आली नाही.
एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वारंवार तडजोड करावी लागत आहे. आपण हिंदुत्वावरून आक्रमक झाल्यास महायुतीमध्ये वैचारिक मतभेद उदभवू शकतात. त्याच्या परिणाम सरकारच्या स्थैर्यावर होऊ शकतो, अशी भीती शिवसेनेमध्ये आहे. मात्र हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यास हिंदुत्वामुळे आपल्याशी जोडलेला ठराविक मतदार दुरावू शकतो, याची पक्की जाणीव शिवसेना नेतृत्वाला आहे. त्यामुळे आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. आमचे हिंदुत्व हे भाजपाप्रमाणे राजकीय नाही, असे शिवसेनेला वारंवार सांगावे लागत आहे.
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी सत्ता की सत्तेसाठी हिंदुत्व? असा सवाल करत भाजपाच्या हिंदुत्वावर तोफ डागली. भाजपाचं हिंदुत्व म्हणजे सत्तेसाठी पांघरलेलं ढोंग आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वारंवार असं स्पष्टीकरण का द्यावं लागतंय, याचा विचार शिवसेना नेतृत्वाला करावा लागणार आहे. शिवसेनेला त्यांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय, हेही स्पष्टपणे मांडता आलेलं नाही. तशीच गेल्या दोन वर्षात हिंदुत्वावरून स्पष्ट भूमिकाही घेता आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व हे भाजपासारखं नाही हे सांगताना शिवसेनेचं हिंदुत्व नेमकं कसं आहे. हेही स्पष्ट करावे लागेल.
सध्या महाविकास आघाडीचं समिकरण राज्यात भक्कम असल्याने शिवसेनेच्या सत्तेला कुठलाही धोका नसला तरी भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना अडचणीत येऊ शकते. तसेच राष्ट्रीय पातळीवर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सोबत घेणे काँग्रेसला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे हिंदुत्व जपायचं की काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएमध्ये प्रवेश मिळवून सेक्युलर पक्षांसोबत भविष्यकालीन राजकारण करण्याच्या दृष्टीने वैचारिक भूमिकेत बदल करायचा, याबाबत शिवसेनेला ठाम भूमिका कधीना कधी घ्यावीच लागणार आहे.