एकीकडे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून शिवसेना कोणाची, यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात द्वंद्व सुरु होते. दोन्ही गटांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला सादर करत आपल्या बाजुने किती ताकद आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. आता राज्यात एकनाथ शिंदेंचे सरकार असताना शिंदेंची शिवसेनाराजस्थानातही वाढली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे राजस्थानात दोन आमदार झाले आहेत. बसपाचे आमदार जसवंत सिंह आणि मनोजकुमार राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील एका छोटेखानी कार्यक्रमात शिंदे यांनी त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला.
यानंतर शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी शिवसेना देशात २३ राज्यांत असल्याचे सांगितले. तसेच हे दोन्ही आमदार शिवसेनेत आले असून ते राजस्थानात लोकसभेसाठी भाजपाला मदत करतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
जसवंत सिंह गुर्जर हे बरी मतदारसंघातून बसपाचे आमदार होते. तर मनोज कुमार हे सादुलपूर येथून आमदार होते. नुकत्याच झालेल्या राजस्थानच्या निवडणुकीत बसपाचे दोनच आमदार निवडून आले होते. हे दोन्ही आमदार शिवसेनेत आल्याने ते यापुढेही आमदार राहणार आहेत. यामुळे शिवसेनेचे दोन आमदार राजस्थान विधानसभेत असणार आहेत.