शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 06:30 IST2020-01-15T03:27:55+5:302020-01-15T06:30:31+5:30
ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे.

शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ
औरंगाबाद/हिंगोली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंगळवारी चार सभापतीपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला हरताळ फासत शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले, तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची वर्णी महिला व बालकल्याण सभापतीपदी लागली.
ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेने ठरवून खेळी केल्यामुळेच शिवसेनेचा महत्त्वाचा एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेत आला नसल्याचीही चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीमध्ये बांधकाम आणि समाजकल्याण हे दोन सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आणि शिवसेनेकडे महिला व बालकल्याण आणि शिक्षण व आरोग्य हे दोन सभापती पद देण्यात येणार होते. हे सत्तावाटप ठरले होते. मात्र, उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने ऐनवेळी भाजपशी हातमिळवणी करीत तीन सभापतीपदे मिळवली. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी ठरल्याप्रमाणे शिवसेनेने माघार घेतली.
हिंगोलीत महाविकास आघाडीत फूट
हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे नवखे आमदार संतोष बांगर यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावत अनुभवी व दिग्गज मानल्या जाणाऱ्या जयप्रकाश दांडेगावकर आणि राजीव सातव यांना राजकीय मात दिली. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना १५, राष्ट्रवादी १२, काँग्रेस १0, भाजप ११ व अपक्ष ३ असे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या एका सदस्याचे पद अनर्ह ठरलेले आहे. महाविकास आघाडीच्या बोलणीनुसार सेनेला अध्यक्ष व महिला बालकल्याण, राष्ट्रवादीला उपाध्यक्ष व कृषी तर काँग्रेसला शिक्षण व समाजकल्याण ही पदे ठरली होती.